ड्रामा कोण करतयं हे जगजाहीर आहे…, अखिलेश यादव यांची पंतप्रधान मोदींवर टीका

संसदेच्या हिवाळी अधिवेशाला आजपासून सुरूवात झाली आहे.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मतदार यादी फेरतपासणीच्या विषयावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी BLO वर कामाचा ताण असल्याचा आणि SIR मुळे मतदान रद्द करण्याचा आरोप केला. एसआयआर लागू करण्याची इतकी घाई का आहे ? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.

देशातील लोकशाही तेव्हाच मजबूत होईल जेव्हा आपला मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार नाही. सध्या अनेक ठिकाणी परिस्थिती अशी आहे की BLO नांही फॉर्म भरण्यास त्रास होत आहे. त्यांना कोणतेही प्रशिक्षण मिळालेले नाही. एसआयआर लोकशाही मजबूत करण्यासाठी असायला हवे, असे अखिलेश यादव यावेळी म्हणाले.

दरम्यान अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केलेल्या टीकेवर अखिलेश यादव यांनी प्रत्युत्तर दिलं.”तुम्हाला माहिती आहे की कोण ड्रामा करत आहे. इथे BLO ज्या पद्धतीने आपला जीव गमावत आहेत तो तुम्हाला ड्रामा वाटते का? भाजप पोलिसांशी संगनमत करून ड्रामा करत आहे, असे ते यावेळी म्हणाले.

भाजपकडे अशी साधने आहेत ज्यांच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. भाजपने नोएडा येथील एका मोठ्या कंपनीला त्यांच्यासाठी काम करण्यासाठी नियुक्त केले आहे. त्यांच्याकडे सर्वांच्या मतदार याद्या आहेत. भाजप 2024 मध्ये ज्या बूथवर हरला होता त्या बूथवरील मते कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या लग्नाचा हंगाम आहे, मग आता SIR का केला जात आहे? निवडणूक आयोग भाजपचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल यावेळी अखिलेश यादव यांनी केला.