ड्रेसिंग रुममध्ये रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमध्ये झाला वाद? विराट कोहलीने केले दुर्लक्ष? फोटो व्हायरल

कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर वन डे मालिकेतील पहिल्या लढतीत हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. रांचीमध्ये झालेल्या लढतीत हिंदुस्थानने 17 धावांनी विजय मिळवला. या लढतीमध्ये किंग विराट कोहली याने वन डे कारकिर्दीतील 52 वे शतक झळकावले, तर रोहित शर्मा अर्धशतक ठोकले आणि सर्वाधिक षटकारांचा विक्रमही आपल्या नावे केला. या लढतीनंतर ड्रेसिंगरुममधील काही फोटो व्हायरल झाले आहेत.

सुरुवातीला रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे ड्रेसिंग रुममधील फोटो व्हायरल झाले. या फोटोमध्ये दोघांचा चेहरा गंभीर दिसत असून ते काहीतरी चर्चा करताना दिसत आहेत. दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. अर्थात दोघे कोणत्या मुद्द्यावर गंभीरपणे चर्चा करत होते हे स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, त्यानंतर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. विजयानंतर विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये परतला तेव्हा त्याने गौतम गंभीरकडे दुर्लक्ष केले असा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. अर्थात हा दावा किती सत्य हे कळत नाही. कारण शतक केल्यानंतर विराट ड्रेसिंग रुममध्ये आला तेव्हा गौतम गंभीर याने त्याचे अभिनंदन करत पाठ थोपटली होती.

विराट कोहलीचे घणाघाती शतकाच्या जोरावर हिंदुस्थानने आफ्रिकेसमोर 350 धावांचे आव्हान उभारले होते. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिकेची हर्षित राणाने आपल्या पहिल्या तीन चेंडूंतच 2 बाद 7 अशी अवस्था केली. कर्णधार एडन मार्करमचा अडझळा अर्शदीप सिंगने दूर करत 3 बाद 11 अशा संकटात पाडले. त्यानंतर आफ्रिकेच्या मधल्या फळीसह तळाच्या फलंदाजांनी आपले योगदान देत सामन्यात आफ्रिकेचे आव्हान जिवंत ठेवले. मॅथ्यू ब्रीझके (72) आणि मार्को यान्सन (70) यांनी सहाव्या विकेटसाठी 97 धावांची भागी रचत संघाच्या जिवात जीव आणला. मग तळाला कॉर्बिन बॉशने 51 चेंडूंत 4 षटकार आणि 5 चौकारांचा झंझावात करत आफ्रिकेला विजयाच्या उंबरठय़ावर नेले. मात्र शेवटच्या षटकांत 19 धावांची गरज असताना प्रसिध कृष्णाने त्याची विकेट काढत हिंदुस्थानला मालिकेतील पहिला विजय मिळवून दिला.

‘सेंच्युरी किंग’ विराट कोहली; सचिन तेंडुलकरचा 51 कसोटी शतकांचा विक्रम मोडला