एसआयआर’वरून संसदेत रणकंदन

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मतदार फेरपडताळणी प्रक्रियेच्या (एसआयआर) मुद्दय़ावरून संसदेत आज मोठे रणकंदन झाले. एसआयआरवर तातडीने चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहांत लावून धरली. ती फेटाळली गेल्याने प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प झाले, तर राज्यसभेत विरोधकांनी सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार घातला.

लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी एसआयआरवर चर्चेची एकमुखी मागणी केली. सरकारने सर्व शंका-कुशंकांचे निरसन करावे, असा आग्रह सदस्यांनी धरला. सभापती ओम बिर्ला यांनी सरकारला काही सूचना देण्याऐवजी विरोधकांनाच शिस्तीचे धडे दिले. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. गदारोळाची शक्यता लक्षात घेऊन सभापतींनी कामकाज सुरुवातीला दुपारी बारा वाजता, त्यानंतर दोन वाजता व नंतर दिवसभरासाठी तहकूब केले.

राज्यसभेत राधाकृष्णन यांच्या स्वागत प्रस्तावावर भाषणे झाल्यानंतर विरोधी सदस्यांनी एसआयआरचा मुद्दा उपस्थित केला. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी सर्व कामकाज थांबवून एसआयआरवर चर्चेची मागणी केली. इतर सदस्यांनीही हीच मागणी केली. एकूण 9 सदस्यांनी एसआयआरसह विविध मुद्दय़ांवर स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली. मात्र सभापतींनी स्थगन प्रस्ताव नाकारला.

तंबाखूजन्य पदार्थांवर सेस

तंबाखूजन्य पदार्थांवर सेस लावण्यासंदर्भातील दुरुस्ती विधेयक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केले, तर मणिपूरच्या जीसीएसटी बिलाला लोकसभेने मंजुरी दिली.

राज्यसभेत खरगेंची टोलेबाजी

राज्यसभेचे नवनिर्वाचित सभापती सी.पी. राधाकृष्णन यांचे आज सभागृहात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधाकृष्णन यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याशी नामसाधर्म्य असलेले राधाकृष्णन प्रभावी कामगिरी करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी माजी सभापती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून सरकारला जोरदार टोले हाणले. ‘धनखड यांना सरकारने सन्मानाने निरोप द्यायला हवा होता, असा चिमटा त्यांनी काढला. ‘राधाकृष्णन हे दोन्ही बाजूंना न्याय देतील. त्यांनी कुठल्याही एका बाजूला (सत्ताधारी पक्ष) फार बघू नये आणि दुसऱया बाजूकडे (विरोधी पक्ष) फार दुर्लक्ष करू नये. दोन्ही महागात पडणारे आहे, असे खरगे म्हणाले.

चर्चेपासून सरकारचा पळ

‘एसआयआर’ ही निवडणूक आयोगाने अवलंबलेली प्रकिया आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. सरकारचा व एसआयआरचा काही संबंध नाही, असे म्हणत लोकसभेत सरकारने हात वर केले. तर, राज्यसभेत किरेन रिजीजू यांनी तातडीने चर्चा घेण्यास नकार दिला. चर्चेला सरकारचा विरोध नाही. मात्र, ती आजच व्हायला हवी ही अट चुकीची आहे. सरकार विचार करते आहे. त्यासाठी काही वेळ हवा, असे रिजीजू म्हणाले. रिजीजू यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी सभात्याग केला.

ड्रामा नको, डिलिव्हरी हवी

‘संसद ही ड्रामा करण्याची जागा नाही. त्यासाठी देश मोकळा आहे. संसदेत डिलिव्हरी हवी. मात्र अलीकडे काही पक्ष केवळ ड्रामेबाजी करताना दिसतात,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधिवेशन सुरू होण्याआधी केली. त्यांच्या या टीकेमुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक खासदारांनी मोदींच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या काही वेळ आधी मोदींनी पत्रकार परिषद न घेता नेहमीप्रमाणे एकतर्फी संवाद साधला. त्यावेळी बिहार निवडणुकीच्या निकालाचा उल्लेख करत त्यांनी विरोधकांवर टीका केली. ‘संसदेचे हे अधिवेशन विधायक व्हायला हवे. विरोधकांनीही त्यांची जबाबदारी पार पाडावी. पराभवाच्या निराशेतून त्यांनी बाहेर यायला हवे, असे मोदी म्हणाले. ‘काही राज्यांत विरोधकांची सरकारे आहेत. तिथे सत्ताविरोधी लाट आहे. त्या पक्षाच्या नेत्यांना तिथे जाऊन काही बोलता येत नाही, त्यामुळे मग ते संसदेत येऊन बोलतात. मागच्या दहा वर्षांपासून ते हा खेळ करत आहेत, मात्र त्याचा उपयोग होताना दिसत नाही. त्यांनी आता रणनीती बदलायला हवी. त्यासाठी मी टिप्स द्यायला तयार आहे,’ असे मोदी म्हणाले.

सतत कपडे बदलणारे, फोटो काढून घेणारे मोदी इतरांना ड्रामेबाज म्हणतात!

नरेंद्र मोदी यांच्या या टीकेचा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार समाचार घेतला. ‘एसआयआर, प्रदूषण हे देशहिताचे प्रश्न आहेत. ते संसदेत मांडणे हा ड्रामा नाही. उलट देशहिताचे प्रश्न संसदेत मांडू न देणे हा ड्रामा आहे,’ असा सणसणीत टोला खासदार प्रियंका गांधी यांनी हाणला.

जे पंतप्रधान सतत कपडे बदलतात, फोटो काढून घेतात, वेगवेगळी नौटंकी करतात, इतिहासाचे राजकारण करतात, ते विरोधकांवर ड्रामेबाजीचा आरोप करतात हे हास्यास्पद आहे. हे आजवरचे सर्वात ड्रामेबाज पंतप्रधान आहेत. त्यांनी संसदेला पथनाटय़ाच्या पातळीवर आणले आहे, अशी खोचक टीका तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांनी केली.

मागच्या 11 वर्षांत सरकारने संसदीय प्रथा-परंपरा पार मोडीत काढल्या आहेत. त्याची असंख्य उदाहरणे देता येतील. आताही देशातील महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी ड्रामेबाजी करत आहेत. त्यांनी व भाजपने हे बंद केले पाहिजे व खऱ्या प्रश्नांना सामोरे गेले पाहिजे, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुनावले.