Mumbai Hit And Run Case- अंधेरीत भरधाव स्कूलबसने वृद्धेला उडवलं, वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात अपघातांचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. अंधेरी पूर्वे परिसरात शुक्रवारी हिट अॅण्ड रनची धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी एका स्कूलबसच्या धडकेत 78 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे. उषा बोलार असे मृत वृद्धेचे नाव आहे. अपघातानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र आता त्याला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, उषा बोलार या भीमानगर येथील मथुरादास वसंतजी रोडजवळील रहिवाशी होत्या. अंधेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा या शुक्रवारी सकाळी 6.45 च्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या होत्या. यावेळी तेली गल्ली परिसरात हा अपघात झाला. यावेळी स्कूल बस अंधेरी कुर्ला रोडकडून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने जात होती. या बसमध्ये किमान 10 मुले होती.

बसचा वेग जास्त होता त्यामुळे चालकाला बसवर नियंत्रण ठेवता आले नाही. आणि उषा यांना बसची धडक लागली. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी चालक संतोष निरगुडे (40) हा पीडितेला पाहण्यासाठी खाली उतरला होता. परंतु त्यांनी पोलिसांना बघताच तो बस घेऊन पळून गेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूलबसमधील कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही. त्यांच्या पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे घरी पाठवण्यात आले. दरम्यान, जखमी महिलेला तातडीने जुहू येथील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मोबाईल फोनच्या मदतीने त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला.

दरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेत काही तासांतच आरोपी निरगुडे याला अटक करण्यात आली. त्याच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे आणि मोटर वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.