परवाना संपला तरी आठ वेळा उड्डाण; एअर इंडियाची बेफिकिरी, प्रवाशांचा जीव धोक्यात

एअर इंडिया या टाटा समूहाच्या विमानसेवेची एक मोठी आणि गंभीर बेपर्वाई उघड झालेय. एअरइंडियाच्या ‘ए320’ विमानाचा उड्डाण परवाना संपलेला होता, तरीही सलग आठ वेळा या विमानाचे उड्डाण झाले. यामुळे शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला. याची माहिती मिळताच डीजीसीएने त्वरीत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

एअर इंडियाच्या 164 सीट असलेल्या ‘ए320’ विमानाचा परवाना समाप्त झालेला होता. तरीही 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी या विमानाचे आठ वेळा उड्डाण झाले. ही बाब उजेडात येताच या विमानाला तत्काळ बाजूला करण्यात आले.

विमानांना उड्डाण प्रमाणपत्र डीजीसीएतर्फे जारी केले जाते. त्याचे नूतनीकरण दरवर्षी करणे गरजेचे आहे. जेणेकरून विमान उड्डाणयोग्य आहे का, त्याची नीट देखभाल झाली आहे का, हे पाहिले जाते. योग्य परवानाशिवाय विमानाचे उड्डाण करणे म्हणजे गंभीर गुन्हा आहे. याप्रकरणी संबंधित सगळ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच डीजीसीएचा तपास पूर्ण होईपर्यंत ए320 च्या उड्डाणावर स्थगिती आणली आहे.