
काही दिवसांपूर्वी हरयाणामध्ये एका 8888 या व्हीआयपी नंबरला 1 कोटी 17 लाख रुपयांची बोली लागली होती. देशातील हा सर्वात महागडा वाहन क्रमांक बनला होता. मात्र आता पुन्हा त्या क्रमांकासाठी बोली लावण्याची वेळ आली आहे. सुधीर कुमार नावाच्या व्यक्तीने ‘एचआर88 बी8888’ या नंबर प्लेटसाठी बोली लावली. सुधीर कुमार हे रोम्युलस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. लिलावात बोली लावल्यानंतर सुधीर कुमार यांना या क्रमांकासाठी बोली लावलेली रक्कम म्हणजेच 1 कोटी 17 लाख 75 हजार रुपये 1 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत जमा करायचे होते. मात्र सुधीर कुमार यांना ती रक्कम जमा करण्यात अपयश आले.
सुधीर कुमार यांनी ही रक्कम दोनवेळा भरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तांत्रिक कारणामुळे ही रक्कम जमा करता आली नव्हती. तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडूनही एवढी मोठी रक्कम मोजून नंबर प्लेट घेण्यास विरोध झाला होता. हरयाणात व्हीआयपी क्रमांकासाठी दर आठवडय़ाला ऑनलाईन लिलाव केला जातो. अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी सायंकाळी 5 ते सोमवारी सकाळी 9 पर्यंत असते.

























































