डॉ. सदानंद दाते होणार नवे पोलीस महासंचालक

राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांना राज्य सरकारने दिलेला दोन वर्षांचा वाढीव मुदतीचा काळ संपत असल्याने रिक्त होणाऱया राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची धुरा वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. सदानंद दाते यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे

1990 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले सदानंद दाते हे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख म्हणून केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर आहेत. राज्यात सदानंद दाते हे सेवाज्येष्ठतेमध्ये वरिष्ठ असून त्यांच्याबरोबर संजय वर्मा आणि रितेश कुमार हे अधिकारीदेखील पोलीस महासंचालकाच्या स्पर्धेत होते. परंतु केंद्र सरकारकडून दाते यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले असून राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते हे जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पदभार स्वीकारणार आहेत.

दाते हे कडक शिस्तीचे आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळखले जातात. डिसेंबर 2026 रोजी दाते सेवानिवृत्त होतील.

दाते यांनी मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना भरीव कामगिरी पार पाडली. त्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सह आयुक्तपदाची यशस्वी धुरा सांभाळली होती. ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्यात दाते यांनी दहशतवाद्यांना रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्तपद त्यांनी भूषविले. शिवाय आयटीबीपीमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनदेखील दाते यांनी कामकाज पाहिले होते.