मतदार यादीतील त्रुटींवर आक्षेप नोंदवण्याची मुदत, 14 दिवसांनी वाढवा; शिवसेना आणि मनसेची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील त्रुटींवर आक्षेप नोंदवण्याची मुदत वाढवावी अशी मागणी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज राज्य निवडणूक आयोगाकडे केली. आणखी 14 दिवस म्हणजेच 17 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असे संयुक्त पत्र दोन्ही पक्षांकडून राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना देण्यात आले.

शिवसेना आणि मनसेच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. संबंधित महापालिका अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक बोलावून सकारात्मक निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन वाघमारे यांनी यावेळी दिले. निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती नोंदवण्याची मूळ अंतिम मुदत 27 नोव्हेंबर होती. सर्वपक्षीय मागणीनंतर आयोगाने ती केवळ सात दिवसांनी 3 डिसेंबरपर्यंत वाढवली, मात्र राजकीय पक्षांनी केलेल्या सखोल पुनरीक्षणानंतर या यादीतील त्रुटी केवळ दुबार मतदारांपुरत्या मर्यादित नसून त्याहूनही गंभीर असल्याचे समोर आले आहे.

याप्रसंगी शिवसेना उपसचिव प्रवीण महाले, उपसचिव सचिन परसनाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार व विभाग अध्यक्ष बबन महाडिक उपस्थित होते.

…यामुळे मुदत वाढवणे गरजेचे

– अनेक संपूर्ण मतदार याद्या एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात घाऊकरीत्या चुकीच्या पद्धतीने समाविष्ट असणे
– 1 जुलै 2025 च्या मूळ विधानसभा यादीत नसलेल्या नावांचा समावेश असणे
– मतदाराचे नाव, पह्टो, पत्ता आणि ओळखपत्र क्रमांक समान असूनही अशा मतदारांची दुबार मतदार म्हणून नोंद नसणे
– अनेक मतदारांना पेंद्रीय निवडणूक आयोगाने कोणतीही सूचना न देता 1 जुलै 2025 पूर्वीच्या मूळ विधानसभा यादीतून वगळलेले असणे.
– यादी पुनरीक्षणासाठी निवडणूक आयोग आणि महानगरपालिकेकडे पुरेसे बीएलओ संख्याबळ उपलब्ध नसणे
– प्रतिनियुक्तीवर घेतलेले बहुसंख्य बीएलओ या कामासाठी अपात्र असल्याचे दिसून येणे