>> वर्णिका काकडे
आगर म्हणजे भात, मीठ, नारळ, सुपारी, भाजीपाला, फळे व मासे संवर्धन करण्याची जागा. असे आगर पिकविणारा तो आगरी समाज. समुद्र किनारा भागातील म्हणजे पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई आणि रायगड, रत्नागिरी या जिह्यांचा उत्तर कोकणमधील प्रदेश ज्याला आगर म्हणतात. या आगरातील मूळ भूमिपुत्र म्हणजेच आगरी, गवळी, कुणबी, कराडी, वाडवळ, कुपारी, कुंभार ह्या शेतकरी व कोळी, खारवी, भोई, भंडारी ह्या दर्यावर्दी जातींचा समूह म्हणजे आगरी समाज. या समाजाची ही बोलीभाषा आगरी बोली. आगरी बोली प्रत्येक गावानुसार थोडीशी बदलते. मुंबईतील हा मूळ समाज ही बोली आता विसरला आहे, तर नवी मुंबईतील आगरी बोलीवर कोळी बोलीचा प्रभाव आहे. वसई-पालघरकडे ही बोली वाडवळ, भंडारी बोली मिश्रित अशी येते. या बोलीत ठराविक उच्चार, स्पष्टता हवी नाही. विरार-वसईकडे ही बरीचशी सानुनासिक आहे, तर अलिबागकडे त्यामानाने स्पष्ट आहे.
आगरी बोलीत वेगळा गोडवा आहे, जो या समाजाचे प्रतिनिधीत्व करतो. आगरी बोली त ‘स’ या शब्दाला अतिशय महत्त्व आहे. वसई, विरार, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या भागातली आगरी मंडळी आईला ‘आईस’, वडिलांना ‘बापूस’ अशा शब्दोच्चारानं संबोधतात; पण काही आज्ञार्थी शब्दांमागेही ‘स’चा वापर करण्यात येतो. उदा. घे ऐवजी ‘झेस’ किंवा दे ऐवजी ‘देस’ इत्यादी. शेतात, आगारात काबाडकष्ट करणाऱयांच्या तोंडून आपसूक बाहेर पडलेली ही स्व-बोली आहे. त्यामुळे तिच्यात प्राचीन आणि अर्वाचीन काळातले काही शब्द येणं स्वाभाविक आहे. जरी काहीवेळा विनोदी मालिकांमध्ये याचा वापर केला जात असला तरी, ही केवळ विनोदाची भाषा नाही, तर तिचे स्वतचे भाषिक वेगळेपण आहे. या बोलीत काही शब्द हे त्या समाजाच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ ‘हंदा’ किंवा ‘अथेर’ या शब्दांचा अर्थ – सामूहिकरीत्या शेतीची कामे पूर्ण करणे.
आगरी बोलीत मी, मला या शब्दांऐवजी मिनी, मना हे शब्द सर्रास बोलले जातात. ल ऐवजी अनेक शब्दांमध्ये न चाच वापर केला जातो. तसेच कशाला ऐवजी कयाला, कशाशी ऐवजी कयाशी, मागणे ऐवजी मांगले, दिसणे ऐवजी कलणे, जास्त, अधिक ऐवजी जवाद हे शब्द जास्त प्रचुर आहेत. ही बोली विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत मौखिक स्वरूपाचीच होती. मुंबईच्या मूळ भूमीपुत्राची ही बोली बहुरंगी, बहुबहुभाषी मुंबईत आपल अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहे. मात्र तरीही मुंबईतील अनेक आगरवाडय़ात ही आगरी बोली आनंदाने नांदताना आपल्याला दिसतेय.
ध्येयाशी तडजोड नसावी

























































