नाविन्यपूर्ण माहिती देणारा इतिहास

मराठी वाचकाचे वाचन हे केवळ आनंद देणारेच असते असे नव्हे तर अभ्यासपूर्णतेचा ध्यास असणारेही हे वाचन असते. यामुळेच मराठी लेखन, पुस्तक क्षेत्रात सातत्याने संशोधनपर विषयांवर आधारित पुस्तकं प्रकाशित होत असतात. यात नव्या जुन्या विषयांची नेहमीच भर पडत असते. नाविन्यपूर्ण माहिती देणारा इतिहास सगळ्यांच्याच आवडीचा. यामुळेच प्राचीन ते अर्वाचिन अशा सार्याच विषयांचा इतिहास संशोधनाच्या निमित्ताने धांडोळा घेतला जातो. प्राचीन मंदिर परंपरा, मूर्तीशास्त्र, मूर्तीविज्ञान या विषयांतील सखोल संशोधनपर अनेक पुस्तके आहेत. गेल्या काही वर्षांत तर या विषयात गोडी निर्माण व्हावी असे साहित्यही अभ्यासकांद्वारे उपलब्ध होत आहे. यात गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेले आणि आवर्जून दखल घ्यावे असे पुस्तक आहे `मराठय़ांचे देवघर – नागपूरकर भोसले व सरदार घराणी’ हे पृथ्वीराज धवड लिखीत पुस्तक. या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे नागपूरकर भोसले आणि अन्य मराठा सरदारांच्या देवघरात असणाऱ या देवाबद्दल माहिती देणाऱया या पुस्तकात प्रामुख्याने देवघरात असणारे टाक याबाबत माहिती दिली आहे. टाक म्हणजे काय? त्याची निर्मिती कशी होते? या काकांचे प्रकार किती? अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून आपल्याला मिळतात. तसेच टाकांच्या निर्मितीचा पूर्वजांशी संबंध, कुलदैवत, लोकदैवत, वीरांचे टांक आणि सतीचे टांक असे विविध प्रकारचे टांक याबाबतची संपूर्ण माहिती या ग्रंथात आहे.