MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आयोगाकडून नव्या तारखा जाहीर

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीने परीक्षेच्या नवीन तारखा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत. नवीन वेळापत्रकाप्रमाणे 4 जानेवारी 2026 आणि 11 जानेवारी 2026 रोजी ही एमपीएससी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र 2 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या राज्यातील 246 नगरपालिका आणि 48 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी होणार असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून 21 डिसेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलत 4 जानेवारी आणि 11 जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे.

काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र आणि मतमोजणी केंद्रामधील अंतर, वाहतूक कोंडी, विजयी मिरवणुका, लाऊडस्पीकरचा आवाज, परीक्षेच्या आयोजनाकरीता कर्मचाऱ्यांची कमकरता इत्याीदी बाबी लक्षात घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.