
श्रेयवादाच्या लढाईत अडकलेली नांदेड ते मुंबई ही विमानसेवा अखेर 25 डिसेंबरपासून सुरु होत आहे. आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्टार एअरने या विमानसेवेसाठी तिकीट विक्री सुरु केली आहे.
दिवाळीत ही विमानसेवा सुरु होणार असे उर बडवून भाजपाचे नेते सांगत होते. मात्र विमानसेवेसाठी ज्या सुविधा, लँडींगची व्यवस्था, विमानाची उपलब्धी याबाबत येणार्या अडचणी लक्षात घेता डिसेंबर अखेरपर्यंत ही विमानसेवा सुरु होऊ शकणार नाही, असे विमान प्राधिकरणाने स्पष्ट केले होते. त्यानुसार विमान प्राधिकरण विभागाने नांदेड-मुंबई विमानसेवेला हिरवा कंदील दाखवला असून, स्टार एअरचे हे विमान येत्या 25 डिसेंबरपासून उड्डाण घेण्यास सज्ज झाले आहे.
आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही विमानसेवा सुरू राहणार आहे. नांदेड ते गोवा या विमानसेवेबद्दल अद्यापही अनिश्चितता आहे. नांदेडहून मंगळवार, गुरुवार, शनिवारी सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी मुंबईसाठी हे विमान उड्डाण घेईल. त्यानंतर सायंकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी मुंबईहून नांदेडसाठी हे विमान रवाना होईल. एक तासाचा अवधी यासाठी निर्धारीत केला आहे.





























































