
निसर्गरम्य नागावमधील वाळंज पारोडा या भागात आज सकाळी बिबटय़ा घुसला आणि ग्रामस्थांची अक्षरशः पाचावर धारण बसली. या बिबटय़ाने दिवसभर धुमाकूळ घालत सहा जणांवर हल्ला केला. त्यातील काही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. बिबटय़ा आला रे.. अशी खबर गावात पोहोचली आणि सर्वांचीच तंतरली. खबरदारी म्हणून नागावमधील शाळादेखील सोडल्या असून पर्यटकांना बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. सतत गुंगारा देणाऱ्या बिबटय़ाला पकडण्यासाठी संध्याकाळी उशिरापर्यंत वनविभागाच्या पथकांनी प्रयत्न केले. पण गावात दहशत माजवत फिरणारा बिबटय़ा त्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. तो कोणत्याही क्षणी पुन्हा येईल या भीतीने नागाववासीयांनी अवघी रात्र जागून काढली.
नागाव येथे महाराष्ट्राच्या विविध भागातून नेहमीच पर्यटक येत असतात. जेमतेम अडीच हजारांची या गावाची वस्ती. दोन वर्षांपूर्वी बिबटय़ा दिसल्याची आवई उठली होती. पण प्रत्यक्षात तो दिसला नाही. आज मात्र सकाळी सातच्या सुमारास बिबटय़ा अचानक गावात घुसला. त्याने अमित वर्तक व प्रसाद सुतार या दोघांवर हल्ला केला. त्यात अमित हा गंभीर जखमी झाला असून प्रसाद याचे बिबटय़ाने कपडे फाडले आहेत.
हल्ला करून निसटला
नागावमधील एका कॉटेजची भिंत आणि पंपाऊंंड वॉल याच्या गॅपमध्ये संध्याकाळच्या सुमारास रेस्क्यू टीमला दिसला. त्याला पकडण्यासाठी जाळय़ा लावल्या. सर्व यंत्रणा सज्ज झाली होती. पण लपून बसलेल्या बिबटय़ाने अनिकेत धवलकर या तरुणावर हल्ला करून तो निसटला. अनिकेत हा जखमी झाला असून त्यालादेखील तातडीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.


























































