
कळसुबाई हे राज्यातील सर्वात उंच शिखर. शनिवार-रविवार जोडून आला की येथे आनंद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, एवढय़ा गर्दीसाठी आवश्यक व्यवस्थापन नसल्याने पर्यटकांना अक्षरशः अडचणी आणि त्रासाचा सामना करावा लागत आहे. यातील लहान मुले, महिला आणि वृद्धांचे सुविधेअभावी हाल होत आहेत.
शनिवार-रविवारी शिखरावर हजारोंचे लोंढे जमा होतात. शिखराच्या मध्यभागी एकाच अरुंद शिडीवरून जाणे-येणे सुरू असल्याने मोठमोठय़ा रांगा लागतात. दोन दोन तास पर्यटकांना थांबावे लागत होते. त्या गर्दीत बालक, महिला आणि वृद्ध यांची प्रचंड गैरसोय झाली. अलोट गर्दी असतानाही प्रशासनाने कोणतीही अतिरिक्त व्यवस्था केली नसल्याचे स्पष्ट दिसून आले. सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचे निदर्शनास आले.
गर्दी नियंत्रणासाठी, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी किंवा प्राथमिक उपचारासाठी तिथे कोणतीही सोय नाही. शिखरावर आधारासाठी लावलेली रेलिंग अनेक ठिकाणी तुटलेली आहेत. अशा स्थितीत एखादी दुर्घटना झाली तर जबाबदार कोण, हा मोठा प्रश्न आहे. पर्यटक सुट्टी असल्याने या ठिकाणी नियमितपणे येतात. तरीही वेगळी शिडी, रुंद मार्ग, सुरक्षा कर्मचारी, प्राथमिक उपचार केंद्र यांसारख्या मूलभूत सोयींची तजवीज करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. याकरिता स्थानिक प्रशासन, वन विभाग, पर्यटन विभाग कोणतीही संस्था पुढे येताना दिसत नाही.
कळसुबाई हे फक्त शिखर नाही, तर पर्यटनाची ओळख आहे. इथे सुरक्षित आणि सुसूत्र व्यवस्था उभारणे ही गरज नव्हे, तर जबाबदारी आहे. गर्दी वाढते, पर्यटकांचे हाल होतात आणि प्रशासन मात्र सुस्त ही स्थिती बदलण्याची वेळ आली असून, तसेच व्यवस्थापनात सुधारणा न झाल्यास होणाऱया गंभीर परिणामांची जबाबदारी कोणाची, असा सवाल पर्यटकांतून करण्यात येत आहे.





























































