गोरेगाव येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागली आग, तीन जण होरपळले

गोरेगाव येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात तिघं जण जखमी झाले आहेत. ही घटना गोरेगाव पश्चिम येथील शहीद भगतसिंग नगर-2 येथील राजाराम चाळीमध्ये घडली. तर दुर्घटनाग्रस्त घरासह शेजारच्या घराची भिंत कोसळली.

सकाळी 7 वाजून 42 मिनीटांनी अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती मिळली. अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वीच रहिवाशांनी पाण्याच्या बादल्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पुढील धोके टाळण्यासाठी अग्निशमन दलाने वीजपुरवठा खंडीत केला. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात 28 वर्षीय मालतीदेवी तीस ते पस्तीस टक्के भाजल्या आहेत. त्यांच्यावर सुरुवातीला ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आणि त्यानंतर तिला एलटीएमजी सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तर अन्य दोघेजण सरजान अली जावेद शेख (37) आणि गुल मोहम्मद अमीन शेख (38) यांना बोरिवली येथील गणेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सरजानच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. तर गुल मोहम्मद अमीनची प्रकृती गंभीर असून त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे आणि तो आयसीयूमध्ये आहे.

स्फोटामुळे लागलेल्या आगीने घरातील प्लास्टिक आणि घरगुती साहित्यामुळे पेट घेतला, याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली. एलपीजी सिलेंडर गळतीमुळे आगीचे कारण समोर आले आहे.