संगमेश्वर – रत्नागिरी सकाळ सहा वाजताची एसटी अचानक बंद; विद्यार्थी संतप्त

st bus

संगमेश्वरहून रत्नागिरीकडे जाणारी सकाळी सहा वाजताची एसटी बस गेल्या सहा–सात दिवसांपासून कोणतीही पूर्वकल्पना न देता बंद करण्यात आल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एसटी बंद करण्यापूर्वी संगमेश्वर आगारात एकही सूचना,फलक,किंवा अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही. या निष्काळजी कारभारावर आता प्रश्नचिन्ह उभे राहत असून विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत.

संगमेश्वर, तिवरे, डिंगणी, फुणगूस आणि आसपासच्या सुमारे पंधरा ते सोळा गावांमधून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी रत्नागिरीतील माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दररोज प्रवास करतात. सकाळची सहाची एसटी ही त्यांच्या शैक्षणिक दिनक्रमाची जीवनवाहिनीच होती.

पहाटे 5 वाजता घर सोडून अनेक विद्यार्थी ही बस पकडण्यासाठी धडपड करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून बसच येत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. पर्यायी वाहनांनी प्रवास करण्याचा अतिरिक्त खर्च,वेळेचा प्रचंड अपव्यय आणि असुरक्षित प्रवास यामुळे विद्यार्थ्यांना दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.

परिस्थिती असह्य झाल्याने आज काही विद्यार्थ्यांनी संगमेश्वर वाहतूक नियंत्रण कक्षात प्रत्यक्ष जाऊन तक्रार वहीत आपली तक्रार अधिकृतपणे नोंदवली. तक्रारीत विद्यार्थ्यांनी स्पष्ट लिहिले आहे की, सकाळची सहा वाजताची रत्नागिरी एसटी अचानक बंद केल्याने आम्हाला कॉलेज प्रात्यक्षिके व्याख्याने यांना वेळेत पोहोचता येत नाही. शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून, सातत्याने अनुपस्थिती लागत आहे.यासोबतच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने दखल घेऊन ही एसटी त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.

संगमेश्वर -रत्नागिरी सकाळी सहा वाजता सोडण्यात येणारी बस विद्यार्थी आणि सकाळी रत्नागिरीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सर्वश्रुत आहे. नागरिक,पालक आणि स्थानिक सामाजिक संघटनांनी यापूर्वीही या बसला वाढत्या गर्दीमुळे कायमस्वरूपी ठेवण्याची मागणी केली होती.मात्र आता हीच बस कोणतेही कारण न देता बंद केल्याने एसटी प्रशासनाच्या निर्णयक्षमतेवर आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

एसटी बंद करताना आगारात नोटीस का लावली नाही?विद्यार्थ्यांचे नुकसान समजूनही प्रशासन शांत का?अन्य बसेसची व्यवस्था का केली नाही?अचानक बंद करण्यामागे नेमके कारण काय?विद्यार्थ्यांचे नुकसान कोण भरेल या सर्व प्रश्नांची उत्तरे एसटी प्रशासनाकडून अपेक्षित उत्तरांची मांगणी विध्यार्थी वर्गाकडून केली जात आहे. विद्यार्थी, पालक, स्थानिक नागरिक यांनी आता एकमुखाने मागणी केली आहे की सकाळची सहा वाजताची संगमेश्वर – रत्नागिरी एसटी तात्काळ पूर्ववत सुरू करावी,अन्यथा विध्यार्थ्यांच्या नुकसानीस एसटी प्रशासनाला जबाबदार ठेवले जाईल असा इशारा दिला आहे.