ड्युटीवरून घरी परतत असताना पोलीस वाहन ट्रकला धडकले; बॉम्बशोधक पथकाच्या चार जवानांचा मृत्यू

ड्युटीवरून घरी परतत असताना पोलीस वाहन ट्रकला धडकल्याने भीषण अपघातात बॉम्बशोधक पथकाच्या चार जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. जखमी कर्मचाऱ्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर भंद्री मालथोनजवळ हा अपघात झाला. पाच सुरक्षा रक्षक मोरेनाहून त्यांच्या शिफ्ट पूर्ण करून घरी परतत असताना हा अपघात झाला. पोलीस व्हॅन समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की वाहनातील चार जवानांता जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. प्रद्युमन दीक्षित, अमन कौरव, डांग मास्टर विनोद शर्मा आणि चालक परमलाल तोमर अशी मृतांची नावे आहेत. मोरेना येथील कॉन्स्टेबल राजवीन चौहान अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बंसल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.