
सोमवारी विधी अभ्यासक्रमाच्या सकाळी पाचव्या सत्राच्या परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे या गोंधळाला जबाबदार असणाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी कुलगुरूंकडे केली आहे. सोमवारी सकाळी विधी अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राची नागरिक सुरक्षा संहिता 2023 या विषयाची परीक्षा सुरू होती. या उत्तरपत्रिकेवर असणारे बारकोड विद्यार्थ्यांना तासाभराच्या उशिराने देण्यात आले. याबाबत सिद्धार्थ विधी महाविद्यालय, फोर्ट येथे परीक्षा देत असलेल्या काही विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे तक्रारी केल्यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी योग्य कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सिनेट सदस्य प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी प्र-कुलगुरू अजय भामरे यांनी दिले.


























































