जिजामाता नगरच्या झोपडपट्टीवासीयांचा वनवास कधी संपणार?

प्रभूरामचंद्राचा वनवास चौदा वर्षांनी संपला, पण काळचौकीच्या जिजामाता नगरमधील झोपडपट्टीवासीयांचा वनवास तीस वर्षे झाली तरी संपत नाही. हा रखडलेला पुनर्विकास प्रकल्प त्वरीत मार्गी लावण्याची मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी आज विधानसभेत केली. त्यावर 5 ते 10 वर्षे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी महिनाभरात बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानसभेत दिले.

काळाचौकीच्या जिजामाता नगरमधील 2800 झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नाकडे अजय चौधरी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले. यावरील चर्चेत हारुण खान, मुरजी पटेल यांनीही भाग घेतला.

जय शिवशाहीप्रकल्प रखडला

या चर्चेत भाग घेताना शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी गेली 22 वर्षे रखडलेल्या वांद्रे येथील ‘जय शिवशाही’ प्रकल्पाकडे सरकारचे लक्ष वेधले. लोक संक्रमण शिबिरात आहेत. पाच वर्षांपूर्वी विकासकावर कारवाई केली पण एकही वीट रचली गेली नाही. भाडे दिलेले नाही. लोकांची घरे बांधली नाही. सोसायटीने विकासकाला हटवण्याचा ठराव केला आहे. त्यावर एसआरएच्या सीईओंकडे कारवाईसाठी प्रलंबित आहे. या साडेचारशे कुटंबांना न्याय देण्याची मागणी केली.

तर कारवाई करू

याबाबत अधिवेशन संपल्यावर बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये प्रलंबित भाडय़ाचीही चर्चा केली जाईल. प्रकल्पांना गती देण्यासाठी काही लोकांवर कारवाई करावी लागली तर निश्चितपणे कारवाई करू, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी दिले.