भोपाळ ते पुणे… 750 किमी प्रवास बलूनने, लष्कराच्या हॉट एअर बलूनिंग मोहिमेचा रेकॉर्ड

लष्कराच्या केनिकल इंजिनीअर केंद्रातील हॉट एअर बलूनिंग विभागाने भोपाळ ते पुणे या मार्गावर बलूनने प्रवास केला. या मोहिमेंतर्गत सुमारे 750 किलोमीटरहून अधिक अंतर 8 तास 44 मिनिटांत पार करण्यात आले असून, पथकाची कामगिरी राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक कालावधीचे ‘हॉट एअर बलून फ्लाइट’ म्हणून ‘एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.

भोपाळ-पुणे दरम्यान राबवण्यात आलेली ही मोहीम 30 नोव्हेंबर रोजी सुरू झाली, तर मोहिमेचा बुधवारी पुण्यात समारोप झाला. सैन्याच्या अ‍ॅडव्हेंचर विंगच्या अधिपत्याखाली ही मोहीम राबवण्यात आली. मोहिमेत मध्य प्रदेशातील नर्मदा खोऱ्यापासून महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांपर्यंतचा विविध भूभाग पार केला. या प्रवासात महू, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथे नियोजित थांबे घेण्यात आले. प्रत्येक ठिकाणी पथकाने स्थानिक तरुणांशी संवाद साधला. तसेच, हॉट एअर बलूनिंग हा आगळावेगळा धाडसी खेळ प्रत्यक्ष पाहण्याची, तसेच भारतीय सैन्याची शोधक वृत्ती, जिद्दीविषयी जाणून घेण्याची संधी देण्यात आली. विक्रम नोंदवणाऱ्या पथकाच्या कामगिरीचे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी कौतुक केले. पथकाची चिकाटी, जिद्द आणि साहसी वृत्तीचे कौतुक केले.