
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात कपात केल्यानंतर देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक भारतीय स्टेट बँक (SBI) ने ग्राहकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. एसबीआयने गृहकर्जासह विविध कर्जांच्या व्याजदरात कपात जाहीर केली आहे. यामध्ये MCLR, EBLR, RLLR, BPLR आणि बेस रेट या सर्व दरांचा समावेश आहे.
ही व्याजदर कपात 15 डिसेंबर 2025 पासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे कर्जावरील व्याजदर कमी होणार असून, ग्राहकांची ईएमआय सुमारे 0.25 टक्क्यांपर्यंत कमी होईल. एसबीआयच्या या निर्णयाचा फायदा लाखो किरकोळ तसेच कॉर्पोरेट कर्जदारांना होणार आहे.
एसबीआयचा हा निर्णय आरबीआयने 25 बेसिस पॉइंट्सने रेपो दरात कपात केल्यानंतर आला आहे. आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो दरात कपात केली असून, या कपातीनंतर रेपो दर 5.25 टक्क्यांवर आला आहे.
सध्या एसबीआयकडून गृहकर्जावर किमान 7.4 टक्के व्याज आकारले जाते, तर वैयक्तिक कर्जावर 9 ते 10 टक्के व्याजदर आहे. मात्र, नव्या निर्णयानंतर गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज दोन्हीवर व्याजदर कमी होणार असल्याने ग्राहकांची मोठी बचत होण्याची शक्यता आहे.
किती कमी होईल ईएमआय?
जर एखाद्या ग्राहकाने EBLR आधारित 30 लाखांचे गृहकर्ज, 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेतले असेल आणि सध्याचा व्याजदर 8% असेल, तर सध्याचा ईएमआय 25,093 आहे.
आता 25 बेसिस पॉइंट्सच्या कपातीनंतर ही ईएमआय कमी होऊन 24,628 इतकी होईल.
एकूणच, आरबीआय आणि एसबीआयच्या या सलग निर्णयांमुळे कर्जदारांना दिलासा मिळणार असून, गृहखरेदी आणि गुंतवणुकीसाठी हे वातावरण अनुकूल ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




























































