… तर कारखान्यांकडून 15 टक्क्यांनी व्याज वसूल करा, ‘जनहित शेतकरी’च्या आंदोलनाला यश

ऊसउत्पादक शेतकऱयांच्या साखर कारखान्याकडून पूर्तता करणे अपेक्षित असणाऱया विविध मागण्यांसाठी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणारे जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपीची रक्कम विहित वेळेत दिली नाही, त्या साखर कारखान्यांकडून वार्षिक 15 टक्के दराने व्याज वसूल करून शेतकऱयांना देण्याचे आदेश साखर सहसंचालकांनी दिले आहेत. साखर कारखान्यांच्या वजनकाटय़ांच्या तपासणीवेळी शेतकऱयांचा प्रतिनिधी घेण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे.

सोलापूर जिह्यातील साखर कारखान्यांनी चालूवर्षीचा उसाचा दर चार हजार रुपये प्रतिटन त्वरित जाहीर करावा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई होऊनही गाळपाची सुरुवात कशी काय केली, याची चौकशी करावी, यांसह विविध मागण्यांसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर 8 डिसेंबरपासून धरणे आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शासनाने दखल घेत प्रभाकर देशमुख यांच्या विविध मागण्यांना मान्यता दिली आहे.

सोलापूर जिह्यातील बरेचसे कारखाने सुरू होऊन सव्वामहिना झाला आहे. यातील काही कारखाने वगळता, एकाही कारखान्याने अद्याप उसाचा दर जाहीर केलेला नाही. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी दोन वर्तमानपत्रांतून याबाबत शेतकऱयांना कळविण्यात यावे, असा आदेश दिला आहे. जे कारखाने याचे पालन करणार नाहीत, ते कायदेशीर कारवाईला पात्र राहतील, असे आदेशात म्हटले आहे. तसेच दक्षिण तालुक्यातील मौजे धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याने बेकायदेशीर गाळप हंगामाचा शुभारंभ करण्याचे धाडस कसे केले, याबाबतची सुनावणी 17 डिसेंबरला होणार असल्याचे साखर सहसंचालकांनी कळविले आहे.

या आंदोलनामध्ये रामभाऊ पाटील, नाना मोरे, विजय तळेकर, बजरंग शेंडेकर, पिंटू पवार, शरद भालेकर, उमेश माने, विशाल बारबोले, तुषार बारबोले, गणेश चवरे, समाधान रणदिवे, किरण वसेकर, बंडू नामदे, अण्णा माळी, मुकुंद काळे, अण्णा काळे, आप्पा भोई, सिद्धार्थ शिंदे, औदुंबर सोंडगे, राहुल प्रक्षाळे, सूरज सुरवसे, संजय सुरवसे आदी शेतकरी सहभागी झाले होते.