
नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या रेटय़ामुळे आज आयुक्तांना माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय रद्द करावा लागला. लेखी पत्राद्वारे आयुक्त यशवंत डांगे यांनी या संदर्भातला खुलासा केला आहे.
काल सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी माळीवाडा वेस पाडण्यासाठी विरोध केला होता. त्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी आपला विरोध नोंदवला होता. विशेष म्हणजे आजूबाजूच्या माळीवाडा भागातील नागरिकसुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने ही कारवाई करू नये, अशी मागणी केली होती. आज सकाळी या संदर्भामध्ये येथील लोकांनी हरकती नोंदवण्यास सुरुवात केली होती व सायंकाळपर्यंत दोन हजार हरकती नोंदवल्या होत्या. इतिहासप्रेमींनीही विरोध केला होता.
अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक माळीवाडा वेस निष्कासित करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या. मात्र, नागरिकांच्या तीव्र जनभावना व लोकहित लक्षात घेऊन सदरची संपूर्ण कार्यवाही रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. संबंधित निर्णयाबाबत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आदेश निर्गमित केले असून, या विषयावर पुढील कोणतीही कारवाई सध्या करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेने घेतलेल्या या निर्णयानंतर नागरिक आणि सामाजिक संघटनांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.



























































