घराच्या उंबऱ्यावर बसलेल्या चिमुरडय़ावर बिबट्याचा हल्ला, संगमनेरमधील घटना; मुलाचा मृत्यू

घरासमोर उंबरठय़ावर बसलेल्या चार वर्षांच्या चिमुरडय़ावर बिबटय़ाने हल्ला केला. तालुक्यातील जवळे कडलग येथे आज सायंकाळी घडलेल्या या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला.

सिद्धेश सुरज कडलग (वय 4) असे बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. जवळे कडलग येथील फळविक्रेते दिलीप कडलग यांचा नातू व सुरज कडलग यांचा चार वर्षांचा मुलगा सिद्धेश आज सायंकाळी आपल्या घरासमोर उंबरठय़ावर बसलेला होता. यावेळी घरामागून आलेल्या बिबटय़ाने त्याच्यावर झडप घातली. या घटनेत सुरजचा अंत झाला. घटनेनंतर मृतदेह संगमनेर घुलेवाडी येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून, आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर अहवाल प्राप्त होणार आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे मानवी वस्तीत निर्माण होणाऱया धोक्यांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन व वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सुरक्षिततेच्या उपायांबाबत त्वरित पावले उचलली नाहीत, तर ग्रामस्थ कडक पवित्रा घेतील, असा इशाराही देण्यात आला आहे