
महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारमधील अधिकारी किती मुजोर झाले आहेत त्याचा धडधडीत पुरावाच शिवसेना आमदार अनिल परब यांनी आज विधानसभेत मांडला. अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत दिनकर कळसकर यांनी वाहतूक निरीक्षक पदावर बदल्यांसाठी 331 अधिकाऱ्यांकडून प्रत्येकी 50 लाख रुपये घेतल्याचे पुरावे असल्याचे दोन पेन ड्राईव्ह आणि संबंधित 245 अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीचे बाडच अनिल परब यांनी सभापती राम शिंदे यांना दिले. या पुराव्यांची कुठेही खातरजमा करा आणि कळसकरवर कठोर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली. पुरावे खोटे ठरले तर कोणत्याही कारवाईला आपण तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
अंधेरीत 37 हजार बोगस लायसन्स दिली, नाशिकमध्ये 4500 बोगस फिटनेस दिले
अनिल परब यांनी भरत कळसकर यांच्या भ्रष्टाचाराची कुंडलीच सभागृहात ठेवली. अनिल परब म्हणाले की, ‘कळसकर हा त्याच्या अधिकाऱ्यांना सांगतो की, कोण अधिकारी पैसे खात नाही. मी आतापर्यंत 600 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नाशिकला 4500 बोगस फिटनेस दिले. अंधेरीत 37 हजार बोगस लायसन्स दिली. आता माझे फक्त 7 महिने सेवेत राहिलेत. त्यामध्ये बरेच काही करायचे आहे. अधिवेशनात काहूर होतच असते. मी एक्सट्रीमिस्ट आहे म्हणजेच अतिरेकी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात दहा-दहा वर्षे लोक जेलमध्ये गेले होते. आता थोडे पैसे खाऊन गेलो तर काय फरक पडतो. माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे. मला जे करायचे ते मी करतो.’
मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी
अनिल परब म्हणाले की, ‘331 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी भरत कळसकर याने प्रत्येकी 50 लाखांची मागणी केली. त्यापैकी पहिले 10 लाख रुपये द्या, मग पोस्टिंग करतो असं तो म्हणाला. त्यापैकी 245 अधिकाऱ्यांनी त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. या गोष्टीची माहिती मंत्र्यांना नाही, पण मला माहिती आहे. कारण मंत्र्यांना याची काहीच माहिती नाही. या 245 तक्रारींची चौकशी करा आणि त्याच्यावर काय कारवाई करायची तेही सांगा, असे अनिल परब म्हणाले.


























































