
पेण नगर परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमला आज चक्क भगदाड पडले. स्ट्राँगरूमचा दरवाजा कुणीतरी अज्ञाताने उघडल्याची बातमी सकाळी पेणमध्ये पसरली आणि प्रचंड खळबळ उडाली. या स्ट्राँगरूमभोवती असलेले सुरक्षारक्षक आणि अधिकाऱ्यांची तर पाचावर धारण बसली. हा स्ट्राँगरूमचा दरवाजा उघडला तरी कसा गेला हे पाहण्यासाठी प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यांना धक्काच बसला. स्ट्राँगरूमच्या आतमध्ये ज्या लाकडी कपाटावर मतदान यंत्र ठेवले आहेत त्याच कपाटाचा दरवाजा चक्क उंदीर मामाने उघडण्याचा कारनामा केल्याचे सीसीटीव्हीत दिसले आणि इतका वेळ प्रचंड तणावात असलेल्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. स्ट्राँगरूमची सुरक्षा भेदणाऱ्या या उंदीर मामाची पेणमध्ये दिवसभर चर्चा सुरू होती.
पेण नगर परिषदेची निवडणूक झाल्यानंतर मतदान यंत्र केईएस शाळेत तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉगरूममध्ये ठेवण्यात आली आहेत. स्ट्राँगरूममधील लाकडी कपाटाचा दरवाजा उघडला गेल्यामुळे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
स्ट्राँगरूमचा दरवाजा उघडल्याचा प्रकार तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी गांभीर्याने घेऊन या परिसरातील सर्व सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यावेळी उंदीर मामाची ही करामत उघडकीस आली. दरवाजा उंदराने उघडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहरात सुरू असलेल्या तर्क-वितर्काच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.


























































