
नागपूर, दि. 14 (प्रतिनिधी)- सध्या अतिवृष्टीच्या मदतीचा ताण असल्याने सरकारची आर्थिक स्थिती अडचणीची आहे. राज्याच्या तिजोरीत खूप पैसे नाहीत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले खरे, पण दुसरीकडे पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका डोळय़ांपुढे ठेवून हजारो कोटींच्या घोषणांचा पाऊस पाडला.
विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. ‘‘आपल्या राज्याच्या तिजोरीत खूप पैसे आहेत असे म्हणणार नाही, पण देशातील मोठय़ा राज्यांच्या अर्थव्यवस्थांचा विचार करता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही कर्जाचे सर्व निकष पूर्ण करणारी आहे. राज्यातील विकासासाठी कर्ज उभारावे लागते. प्रत्येक राज्य ते कर्ज उभारते. राज्याची वित्तीय तूट 3 टक्क्यांच्या आतच आहे. राज्याची अर्थव्यवस्था भक्कम असून 2030पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जनकल्याण मार्ग ते कर्जमाफी
मुंबई-हैदराबाद या नवीन जनकल्याण द्रुतगती मार्गाची घोषणा. मुंबई ते लातूर अंतर साडेचार तासांवर येणार. 36 हजार कोटी खर्च होणार.
मुंबईत पुढील 2 वर्षांत 132 किमीचे मेट्रो मार्ग सुरू होणार.
1 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करणार.
दोन वर्षांत एक लाख 20 हजार शासकीय नोकऱ्या.
देशातील थेट विदेशी गुंतवणुकीपैकी 31 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली.
शक्तिपीठ महामार्गावर सरकार ठाम, पंधरा दिवसांत काम सुरू होणार
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असला तरी सरकार या मार्गाचे काम पुढे नेण्यावर ठाम असल्याचे आज स्पष्ट झाले. येत्या 15 दिवसांत या महामार्गाचे काम सुरू होईल, अशी माहिती फडणवीस यांनी आज दिली. मात्र या मार्गाचे संरेखन (अलायनमेंट) बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवा मार्ग सोलापूर व सांगलीतून जाईल. या मार्गाचे नाव नागपूर-गोवा असले तरी याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाडय़ाला होईल. मराठवाडय़ाचे चित्रच बदलून जाईल, असे फडणवीस म्हणाले.






























































