
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटलांनी गृहखात्यावर सडकून टीका केली. पोलीस हजामती करताहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्याला मंत्री संजय सावकारेंनी आक्षेप घेताच, ‘मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये,’ अशा शब्दांत जयंत पाटील यांनी मंत्री सावकारे यांना सुनावले. मात्र, ‘हजामती’ हा शब्द संसदीय की असंसदीय यावरूनदेखील सभागृहात चकमक झाली.
अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत बोलताना जयंत पाटील यांनी राम खाडे यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचा उल्लेख करून त्यांचा एक पाय, एक हात तुटला. पंधरा दिवसांपूर्वी नगर जिह्यात त्यांच्यावर हल्ला झाला. मेला आहे म्हणून माणसांनी सोडला. दहा-बारा जणांनी एकाचवेळी हल्ला केला. जवळपास मेलेला होता; पण कसाबसा तो वाचला. आता तो शुद्धीवर आला आहे. त्याचा एक पाय तुटला. एक हात तुटला. पंधरा दिवस झाले, तरी एक माणूस सापडला नाही, मग पोलीस काय हजामती करतात की काय? मला आश्चर्य वाटत आहे, असा संताप जयंत पाटलांनी पोलिसांच्या तपासावर व्यक्त केला.




























































