
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉकमुळे लोकल सेवेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. माटुंगा ते मुलुंडदरम्यान लोकलसह एक्सप्रेस गाडया धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या. परिणामी, लोकल गाडयांना तब्बल 20 ते 30 मिनिटांचा विलंब झाला. सकाळपासून सायंकाळपर्यंत हा गोंधळ कायम राहिला. त्यामुळे दिवसभर सर्वच रेल्वे स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली होती.
मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेतला होता. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत सुटलेल्या डाउन जलद मार्गावरील गाडया माटुंगा स्थानकावरून डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. पुढे मुलुंड स्थानकावरून पुन्हा डाउन जलद मार्गावर गाडया चालवण्यात आल्या. अप दिशेने होणारी लोकल वाहतूक देखील जलद मार्गावर वळवली. तसेच लांब पल्ल्याच्या गाडया धिम्या मार्गावरुनच वळवण्यात आल्याने मध्य रेल्वेच्या लोकल सेवेच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडाला. अप आणि डाऊन मार्गावरील सर्वच लोकल जवळपास अर्धा तास विलंबाने धावल्याने प्रवाशांची जागोजागी रखडपट्टी झाली. त्यामुळे महिला, वृद्ध नागरिक आणि लहान मुलांची मोठया प्रमाणावर गैरसोय झाली. सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण कुटुंबियांसोबत घराबाहेर पडले होते. त्यांना सकाळप्रमाणेच सायंकाळी रिटर्न प्रवासातही लोकलच्या विस्कळीत वेळापत्रकाचा मनस्ताप सहन करावा लागला.
प्रवाशांची रस्ते प्रवासात रिक्षाचालकांकडून लूट
मध्य रेल्वेच्या गोंधळामुळे अनेक प्रवासी रस्ते प्रवासाकडे वळले. त्यांच्या गैरसोयीचा रिक्षाचालकांना फायदा उठवला. अनेक चालकांनी मीटरप्रमाणे भाडेआकारणी न करता मनमानीपणे भाडे सांगितले आणि प्रवाशांची लूट केली. मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बरची सेवा बंद ठेवली होती. त्यामुळे प्रवाशांची चौफेर कोंडी झाली होती. मुंबईच्या पूर्व उपनगरात धावलेल्या बेस्ट बसगाडया प्रवाशांनी खचाखच भरल्या होत्या.


























































