नवी मुंबई विमानतळावर तयार होणार तिसरी धावपट्टी, सल्लागाराच्या नियुक्तीची प्रक्रिया सिडकोने सुरू केली

देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड एअरपोर्ट म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसरी धावपट्टी तयार होणार आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी तांत्रिक व्यावसायिक व्यवहार्यता सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सिडकोने सुरू केली असून या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ संस्थांकडून निविदा मागवल्या आहेत. ही धावपट्टी तयार झाल्यानंतर या विमानतळाची प्रवासी हातळण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या २५ डिसेंबरपासून प्रवासी सेवा सुरू होणार आहे. विमानतळावर सध्या एकच धावपट्टी आहे. दुसऱ्या धावपट्टीचे काम २०३६ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर या विमानतळाची प्रवासी हातळण्याची क्षमता वर्षाला सुमारे ९ कोटी होणार आहे. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी हातळण्याची वार्षिक क्षमता सुमारे साडेपाच कोटी प्रवाशांची आहे. या दोन्ही विमानतळांमुळे मुंबई प्रदेशाची हवाई प्रवासी हातळण्याची क्षमता वर्षाला सुमारे १५ कोटींपर्यंत पोहोचणार आहे. नवी मुंबई विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या धावपट्टीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

– तिसऱ्या धावपट्टीच्या निर्मितीसाठी सिडको आता अॅक्शन मोडवर आली आहे. या प्रकल्पाचा सर्वच दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी सिडकोने निविदा मागवल्या आहेत. त्यासाठी एकच संस्था किंवा भागीदारात असलेल्या संस्थाही अर्ज करू शकणार आहेत.

– विमानतळाची घोषणा झाली त्या वेळी प्रकल्पग्रस्तांनी जागा देण्यास कडाडून विरोध केला होता. मात्र विमानतळाच्या तिसऱ्या धावपट्टीसाठी जमिनी देण्याची तयारी स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी दाखवली आहे.

– नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एक हजार १६० हेक्टरवर विस्तारलेले आहे. या विमानतळाचा विकास पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात वर्षाला दोन कोटी प्रवासी या विमानतळावरून प्रवास करणार आहेत.

– २०३६ नंतर हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवासांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन या तिसऱ्या धावपट्टीची निर्मिती करण्यात येणार आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले