
भात कापणी होऊन दोन महिने उलटले तरी डहाणू तालुक्यात भात खरेदी केंद्राचा काटा लागलेला नाही. त्यामुळे नफेखोर व्यापारी गावागावांमध्ये फिरून पडत्या दराने शेतकऱ्यांच्या भातावर डल्ला मारत आहेत. त्यामुळे घोषणा करून गायब झालेले आदिवासी विकास मंडळाचे नक्की चालले तरी काय, असा सवाल डहाणूकरांनी केला आहे.
डहाणू तालुक्यात यंदा सहा ठिकाणी भात खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू असून पासबुक, आधारकार्ड आणि सातबारा उताऱ्याची नोंद घेण्यात येत आहे. केंद्रांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. तसेच सरकारी हमीभावानुसार शेतकऱ्यांना २ हजार ३६९ रुपये प्रतिक्विंटल दर मिळणार आहे. मात्र अद्याप भात खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. प्रशासन भात खरेदी केंद्रे नेमकी कधी सुरू करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आम्ही भात जोडणी करून विक्रीसाठी तयार ठेवला आहे, पण तालुक्यात खरेदी केंद्रे सुरू नाहीत. भात कुठे आणि कधी विकायचा याचीच वाट पाहत आहोत. प्रशासनाने तत्काळ ही केंद्रे सुरू करावीत. – रघुनाथ जाधव (शेतकरी)
लवकरच डहाणू तालुक्यात भात खरेदी केंद्रे सुरू होतील. शेतकऱ्यांनी आपली नोंदणी त्वरित करून घ्यावी. योगेश पाटील, व्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालय, जव्हार
अन् व्यापारी गावोगाव भटकू लागले
भात खरेदी केंद्रे सुरू होण्यास विलंब होत असल्याने भात खरेदीसाठी नफेखोर व्यापारी गावोगावी भटकू लागले आहेत. एकीकडे सरकारी हमीभाव दोन हजार असताना व्यापाऱ्यांनी मात्र १ हजार ८०० ते १ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल दर ठरवला आहे. दरम्यान, भात खरेदी केंद्रे सुरू न झाल्यास व्यापाऱ्यांचे चांगभले होईल आणि शेतकरी आर्थिक अडचणीत सापडेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.






























































