
दोन गटात सुरु असलेली मारामारी सोडवायला गेलेल्या पोलीस पथकावर स्थानिर गुंडांनी हल्ला केल्याची घटना कांदिवलीत घडली. घटनेनंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले असून गुंडांना ताब्यात घेण्याची आणि गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. हल्ल्यानंतर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कांदिवली पश्चिमेकडील एकता नगर परिसरात रविवारी रात्री दोन गटात हाणामारी सुरू होती. घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक गुंडांनी पोलिसांवरच हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावारण निर्माण झाले.
पोलिसांवरील हल्ल्यानंतर परिसरात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सर्व संशयित गुंडांची धरपकड सुरू आहे. मुख्य आरोपींविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.




























































