सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ सागरी कचरा स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्पा यशस्वी

वनशक्तीच्या सागरशक्ती (Aqua Wing) यांच्या वतीने सागरी कचरा स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्पा (ड्राइव्ह 1) आज यशस्वीरीत्या पार पडला. ही मोहीम सिंधुदुर्ग किल्ल्याभोवतालच्या जैवविविध प्रवाळ (कोरल) परिसंस्थेत राबवण्यात आली. या मोहिमेत सुमारे 400 किलो सागरी कचरा संकलित करण्यात आला.

या उपक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांचे अर्थसहाय्य लाभले असून मँग्रोव्ह सेल, राज्य मत्स्य व्यवसाय विभाग, मालवण नगर परिषद, Youth Beats for Climate आणि नीलक्रांती यांच्या सहकार्याने ही मोहीम पार पडली. उद्घाटन कार्यक्रमाला सर्व सहभागी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्थानिक प्रशिक्षित स्कुबा डायव्हर्स यांच्या मदतीने समुद्रतळातील कचरा अत्यंत काळजीपूर्वक गोळा करण्यात आला. यामध्ये घोस्ट नेट्स, प्लास्टिक बाटल्या, कॅन्स, प्लास्टिक पिशव्या, काचेच्या बाटल्या तसेच बोटींचे फायबरचे तुकडे आढळून आले.

या मोहिमेमुळे जमिनीवर चुकीच्या पद्धतीने व्यवस्थापित केलेला कचरा थेट समुद्रात पोहोचून सागरी जीवसृष्टीला गंभीर धोका निर्माण करत असल्याचे स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी प्रवाळांवर घोस्ट नेट्स अडकलेले आढळून आले असून त्यामुळे प्रवाळांची वाढ व संपूर्ण सागरी परिसंस्था बाधित होत आहे. सागरशक्ती व वनशक्ती संस्थांनी सागरी परिसंस्था जपण्यासाठी सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले असून, समुद्र संरक्षणासाठी असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातील, असे नमूद केले.