
जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला दिला जात नाही तसेच एक वकील पैसे परत करत नसल्याने वैतागलेल्या विरारमधील एका 45 वर्षीय व्यक्तीने उच्च न्यायालयाच्या गेटबाहेर अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न आज केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.
प्रकाश सावंत असे त्या व्यक्तीचे नाव आहे. विरार येथे राहणाऱया प्रकाश यांनी आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक 4च्या बाहेर सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून जाळून घेतले. हा प्रकार निदर्शनास येताच तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी तत्काळ आग विझवून प्रकाश यांना जी.टी. इस्पितळात नेले. प्रकाश हे 50 ते 60 टक्के होरपळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकाश यांना जमीन अधिग्रहाणाचा योग्य मोबदला मिळत नव्हता.






























































