लोको पायलटच्या प्रश्नांवर रेल कामगार सेना आक्रमक, साप्ताहिक सुट्टीसाठी दिल्लीत आवाज उठवणार

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात काम करणारे लोको पायलट अतिरिक्त डय़ुटी, सलग आठवडाभर रात्रपाळी, साप्ताहिक सुट्टीचा अभाव आदी प्रश्नांना तोंड देत आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे लोको पायलटमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेत रेल कामगार सेनेचे शिष्टमंडळ लवकरच दिल्लीत रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाच्या सीईओंची भेट घेणार आहे.

देशात सध्या इंडिगो एअरलाईन्सचा प्रश्न गाजत आहे. तशीच परिस्थिती रेल्वेमध्ये उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कामगार कायद्यानुसार लोको पायलटला 8 ते 9 तासच डय़ुटी करायची असते. प्रत्यक्षात त्यांच्याकडून 10 ते 14 तास काम करून घेतले जात आहे. मालगाडी चालकांना 8 ते 10 दिवसांनंतर केवळ 30 तासांची साप्ताहिक सुट्टी मिळते. ती सुट्टी मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. कर्मचाऱयांना सलग केवळ तीन रात्री काम करण्यास मुभा आहे. परंतु, लोको पायलटना सलग 6 ते 7 दिवस रात्रपाळीत काम करण्यास भाग पाडले जात आहे. सुट्टय़ा मिळणे दुरापास्त झाले आहे. लोको पायलटवरील अन्याय तातडीने दूर करण्यात यावा या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रेल कामगार सेनेचे शिष्टमंडळ लवकरच दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्डाचे सीईओ तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱयांची भेट घेणार आहे. या भेटीदरम्यान व्हीआरएस, मोटरमनचे प्रश्न, ‘स्पाड’अंतर्गत कारवाई, मानसिक चाचणीत फेल झाल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान आदी प्रश्नांवरही आवाज उठवण्यात येणार आहे. शिवसेना उपनेते, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव (बाबी), मुंबई विभागीय सचिव तुकाराम कोरडे आणि रनिंग ब्रँचप्रमुख प्रशांत कमानकर यांनी ही माहिती दिली.

कित्येकदा उपाशीपोटी काम करण्याची वेळ!

रेल्वेच्या मालवाहतूकमधून सरकारला मोठय़ा प्रमाणावर महसूल मिळतो. त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेत विशेष वाटा आहे. असे असताना मालगाडय़ांच्या चालकांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. लोको पायलट्सची जेवण्याची वेळ निश्चित नसते. त्यांना अनेकदा कामाच्या अतिरिक्त ताणामुळे उपाशीपोटी काम करावे लागत आहे. सेक्शनमध्ये जेवण, नाश्ता, पिण्याचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था नसते याकडे रेल कामगार सेनेने लक्ष वेधले आहे.