
रस्त्यावरील धुळीने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने टँकरच्या माध्यमातून पाणी फवारले असून गेल्या दोन महिन्यांत 67.86 टन धूळ यंत्राच्या साहाय्याने झाडली आहे. पालिकेने तसे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल केले असून मुंबईतील प्रदूषणप्रकरणी न्यायालयात पुढील सोमवारी सुनावणी होणार आहे.
मुंबईच्या हवेचा दर्जा प्रदूषणामुळे घसरला असून याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्युमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर आज सोमवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पालिकेच्या पर्यावरण आणि हवामान विभागाचे मुख्य अभियंता अविनाश काटे यांच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 1954 बांधकाम साईट्स सुरू असून 1020 साईट्सवर लो कॉस्ट सेन्सर बसवण्यात आले आहेत. 397 सेन्सर बसवण्याचे काम सुरू आहे. धुळीने प्रदूषण वाढू नये म्हणून पालिकेने 106 टँकरच्या साहाय्याने गेल्या दोन महिन्यांत मुंबईच्या 24 वॉर्डमधील 1518.35 किमी रस्त्यांवर पाणी शिंपडले आहे.
246 बेकऱयांमधून धूर सुरूच
पालिकेच्या हद्दीत एकूण 593 बेकऱया आहेत. यापैकी 209 बेकऱया आधीच हरित इंधनावर कार्यरत होत्या, तर एकूण 347 बेकऱयांनी हरित इंधनासाठी आवश्यक त्या निकषांचे पालन केले व काही त्या प्रक्रियेत आहेत. याशिवाय 246 बेकऱयांचे हरित इंधनात रूपांतर अद्याप बाकी असून त्या धूर सोडत आहेत अशा बेकऱयांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे पालिकेने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.































































