वेगळी चूल मांडून भाजपला मदत होईल अशा भूमिका या मुंबईच्या लढ्यात घेऊ नका, लोकं विसरणार नाहीत; संजय राऊत यांचा काँग्रेसला इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसला इशारा दिला आहे. ”काँग्रेसने या निवडणूकीत वेगळी चूल मांडून भाजपला मदत होईल अशी भूमिका या मुंबईच्या लढ्यात घेऊ नका, लोकं विसरणार नाहीत”, असा इशारा संजय राऊत यांनी केला. तसेच मुंबईच्या या लढ्यात काँग्रेस नेत्यांनी मुंबईच्या लढ्यात आमच्यासोबत राहावं असे आवाहनही त्यांनी केले.

”येत्या आठवड्यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा व्हायला हरकत नाही. दोन पक्षप्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल. काँग्रेस याक्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही. बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे. मुंबईच्या या लढाईत त्यांनी आमच्यासोबत असायला हवं. आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी देखील बोललो त्यांनी हा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांवर ठेवले आहेत. या नेत्यांना आमचं आवाहन कायम असेल की तुम्ही वेगळी चूल मांडून भाजपला मदत होईल अशा भूमिका या मुंबईच्या लढ्यात घेऊ नये. लोकं हे विसरणार नाहीत. भविष्यात लोकसभा, विधानसभा निवडणूका येणार आहेत” असे संजय राऊत म्हणाले.

मनसे हा पक्ष मारामारी करतो, शिव्या देतो असा काँग्रेसने आरोप केला होता. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”आम्हीही शिव्या देतो. मराठी माणूस आहे. अन्याय झाला की तो उसळतो. अमित शहांनी परवा संसदेत साला शिवी घातली. तेव्हा काय केलं आम्ही? संसद बंद पाडायला हवी होती. पण काय केलंत. सहन करताय ना सगळं. जे महाराष्ट्राच्या मुळावर येतील त्यांना जोड्याने मारलं पाहिजे, शिव्या घातल्या पाहिजे. जे शत्रू आहेत महाराष्ट्राचे, जे महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. जे मराठी माणसाला अपमानित करतायत त्यांना शिव्या नाही घालायच्या तर ओव्या गायच्या का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.