अभिज्ञान कुंडूचा नाबाद द्विशतकी धमाका, हिंदुस्थानचा मलेशियावर 315 धावांनी दणदणीत विजय

हिंदुस्थान आणि नवखा मलेशिया यांच्यातील 19 वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारचा सामना मांजर-उंदराच्या खेळासारखा ठरला. या लढतीत हिंदुस्थानने मलेशियाचा 315 धावांनी धुव्वा उडविला. हिंदुस्थानने 7 बाद 408 धावांचा डोंगर उभारल्यानंतर मलेशियाचा 32.1 षटकांत अवघ्या 93 धावांत खुर्दा उडाला. यष्टिरक्षक फलंदाज अभिज्ञान कुंडूने नाबाद द्विशतकी (209) खेळी करीत हा सामना खऱया अर्थाने गाजविला.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानी संघाने 7 बाद 408 धावांचा डोंगर उभारला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या अभिज्ञान कुंडूने तीन गडी बाद झाल्यानंतर वेदांत त्रिवेदीसोबत चौथ्या विकेटसाठी 209 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. कुंडूने 125 चेंडूंत नाबाद 209 धावा करताना 16 चौकार आणि 9 षटकार ठोकले. कुंडूच्या शानदार खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने 7 बाद 408 धावा केल्या. वेदांत त्रिवेदीने 106 चेंडूंत 90 धावांची संयमी खेळी केली, तर वैभव सूर्यवंशीने अवघ्या 26 चेंडूंत 50 धावांची झटपट अर्धशतकी खेळी केली. मलेशियाकडून मुहम्मद अकरमने 89 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियाची 93 धावांत दाणादाण उडाली. यात दीपेश देवेद्रनने 22 धावांत सर्वाधिक 5 बळी टिपले. याचबरोबर उधव मोहनने 2, तर किशन सिंग, खिलन पटेल व कनिशक चौहान यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

अभिज्ञानच्या विक्रमाची अधिकृत नोंद नाही

अभिज्ञान कुंडूच्या नाबाद द्विशतकी विक्रमाचा युवा एकदिवसीय स्पर्धेच्या अधिकृत नोंदींमध्ये समाविष्ट होणार नाही. मलेशिया हा आयसीसीचा पूर्ण सदस्य देश नसल्यामुळे या सामन्याला 19 वर्षांखालील आंतरराष्ट्रीय सामन्याचा दर्जा देण्यात आलेला नाही. यापूर्वी मलेशियाविरुद्धच पाकिस्तानच्या समीर मिन्हासने 177 धावा केल्या होत्या, त्या धावाही यूथ वन डे विक्रमामध्ये गणल्या गेल्या नव्हत्या. तसेच 2012 च्या आशिया कपमध्ये बांगलादेशच्या सौम्य सरकारने कतारविरुद्ध केलेले द्विशतकही अधिकृत नोंदीत नाही.

हिंदुस्थानचा सलग तिसरा विजय

या स्पर्धेत हिंदुस्थानने सुरुवातीचे तीनही सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात हिंदुस्थानने यूएईचा 234 धावांनी पराभव केला होता. त्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 171 धावांची दमदार खेळी केली होती. दुसऱया सामन्यात हिंदुस्थानने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 90 धावांनी मात केली. आता मलेशियाला 315 धावांनी धूळ चारली.