
माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी पार्क मैदानावर सुरू झालेल्या प्रकाश पुराणिक स्मृती महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमधील उद्घाटनीय सामन्यात गतविजेता दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने साईनाथ स्पोर्ट्स क्लबचा 201 धावांनी मोठा पराभव करून विजयी सलामी दिली.
माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर साईनाथ स्पोर्ट्स क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने कर्णधार पूनम राऊत (नाबाद 77) आणि चौथ्या क्रमांकावरील सिमरन शेखच्या (51) दमदार फलंदाजीमुळे निर्धारित 20 षटकांत 4 बाद 225 अशी मोठी धावसंख्या उभारली. सलामीची सारा सामंत (40) आणि पाचव्या क्रमांकावरील मंजिरी गावडे (39) यांनी चांगली साथ दिली.
प्रतिस्पर्धी संघाचे मोठे आव्हान साईनाथ स्पोर्ट्स क्लबला पेलवले नाही. त्यांचा डाव 12.4 षटकांत अवघ्या 24 धावांमध्ये आटोपला. त्यांच्या एकाही फलंदाजाला दोन अंकी धावा काढता आल्या नाहीत. मध्यमगती गोलंदाज अदिती सुर्वे (4 धावांत 3विकेट) तसेच रेश्मा नायक (5 धावांत 2विकेट), रिद्धी ठक्कर (6 धावांत 2 विकेट) आणि फातिमा जाफर (2 विकेट) यांनी अचूक मारा करत दिलीप वेंगसरकर फाउंडेशनला मोठा विजय मिळवून दिला. तत्पूर्वी उद्घाटनप्रसंगी अभिनेता कुणाल विजयकर यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, डॉ. नंदिता पालशेतकर, प्रदीप पालशेतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
































































