
विषारी प्रदूषित हवेचा विळखा घट्ट झाल्यानंतर दिल्लीतील राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. दिल्लीत आता वैध ‘पीयूसी’ प्रमाणपत्र असल्याशिवाय पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. तसेच इतर राज्यांमधील बीएस-6 श्रेणी वगळता सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री मनजिंदरसिंग सिरसा यांनी ही माहिती दिली.
पेट्रोल-डिझेलबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवार 18 डिसेंबरपासून करण्यात येणार आहे. पुढील आदेशापर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. राज्यात केवळ दिल्ली नोंदणी असलेल्या वाहनांनाच प्रवेश मिळेल, इतर राज्यांमधील खासगी वाहनांना प्रवेश मिळणार नाही. दिल्लीत सर्व बांधकामांना तत्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आले असून बांधकामाचे साहित्य वाहून नेणाऱया वाहनांकडून मोठा दंड आकारण्यात येईल तसेच ती वाहनेही जप्त करण्यात येईल, असे सिरसा यांनी सांगितले.
– विषारी स्मॉगने दिल्लीला व्यापले आहे. त्यामुळे विमान आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दिल्लीतून 228 उड्डाणे रद्द करण्यात आली असून 250 विमानांना विलंब झाला.






























































