
आपल्या विभागातील मंडलाधिकाऱ्याकडून 40 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या नायब तहसीलदाराला पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी कार्यालयातच अटक केली. चंद्रकांत काशिनाथ हेडगिरी असे अटक करण्यात आलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे.
उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात हेडगिरी कार्यरत असून, सापळ्यात सापडताच, ‘हे पैसे माझे नाहीत’, असे म्हणत थयथयाट करत गोंधळ घालत होता. परंतु नोटांना आणि त्याच्या हाताला लागलेल्या ऍन्थॅसिन पावडर दाखविताच हेडगिरी चिडीचूप झाला.
तक्रारदार मंडलाधिकाऱ्याचे 8 महिन्यांचे वेतन थकीत होते. हे थकीत वेतन काढण्यासाठी नायब तहसीलदार चंद्रकांत काशिनाथ हेडगिरी याने 60 हजार रुपयांची लाच मागितली. यात तडजोडअंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. सायंकाळी शासकीय कामकाज संपवून घरी जाण्यापूर्वी नायब तहसीलदार हेडगिरी याने कार्यालयातच मंडलाधिकाऱ्याकडून लाचेचे पैसे घेतले असता, त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
कारवाई झाल्याचे लक्षात आल्यानंतर नायब तहसीलदार हेडगिरी गोंधळ घालू लागला. ‘मी पैसे घेतलेच नाहीत, हे पैसे माझे नाहीत. तक्रारदाराचे माझ्याकडे कामच नव्हते’, असे म्हणून थयथयाट करत असताना कारवाईसाठी नोटांना लावण्यात आलेले ऍन्थॅसिन पावडर आणि त्याच्या हाताला लागलेली पावडर दाखविण्यात आल्याने तो चिडीचूप झाला.
उत्तर सोलापूर तहसील कार्यालय आणि सोलापूरचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय दोन्ही हाकेच्या अंतरावरच आहेत. या कारवाईने तहसील कार्यालयात खळबळ उडाली होती. नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरी याला अटक करण्यात आली असून, सदर बझार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































