
सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. नवीन वर्षाची दिनदर्शिका हाती आली की नोकरदार आधी सुट्टय़ा बघून फिरण्याचे प्लॅनिंग करतात. नवीन वर्षांत महाशिवरात्र आणि लक्ष्मीपूजन या सुट्टय़ा रविवारी आल्याने त्या बुडणार आहेत. महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा 1 मे रोजी एकाच दिवशी आले आहेत. स्वातंत्र्य दिन आणि पारसी नववर्ष 15 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्यामुळे नोकरदारांचे सुट्टय़ांचे गणित बिघडणार आहे.
नवीन वर्षाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. या नवीन वर्षात काय होणार याविषयी माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. नवीन वर्षात एकूण चार ग्रहणे होणार आहेत. 17 फेब्रुवारीला कंकणाकृती सूर्यग्रहण, 3 मार्चला खग्रास चंद्रग्रहण, 12 ऑगस्टला खग्रास सूर्यग्रहण आणि 28 ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहेत. परंतु 3 मार्च रोजीचे एकच चंद्रग्रहण हिंदुस्थानातून दिसणार आहे. 31 मे रोजी ‘ब्ल्यू मून’ योग येत आहे. तसेच 24 डिसेंबर रोजी सर्वांना सुपरमूनचे दर्शन होणार आहे.
अधिक मासामुळे सण उशिरा
नूतन वर्षात चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी असल्याने अमावास्या संपल्यावर 19 मार्च रोजी सकाळी 6.53 नंतरच गुढीपाडवा सण साजरा करायचा आहे. हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी 14 सप्टेंबर रोजी येत आहे. तसेच दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी 8 नोव्हेंबर रोजी आहे. 17 मे ते 15 जून ज्येष्ठ अधिक मास असणार आहे. त्यामुळे सर्व सण उशिरा येणार आहेत.
विवाह मुहूर्त कमी
विवाहेच्छुकांना मात्र काढीव, गौण मुहूर्तांवर विवाह करावा लागणार आहे. कारण अधिक मास, गुरू-शुक्र ग्रहांचा अस्त, चातुर्मासात आणि सिंहस्थ यामुळे नववर्षात विवाह मुहूर्त कमी आहेत. जानेवारी, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात शुद्ध विवाह मुहूर्त नाहीत.
त्रिखंडी सिंहस्थ कुंभमेळा!
यावेळी गुरू ग्रह वक्री-मार्गी झाल्याने तीन वेळा सिंह राशीत येणार आहे. याला त्रिखंडी कुंभपर्व म्हणतात. 31 ऑक्टोबर 2026 ते 24 मार्च 2027, 25 जून 2027 ते 26 नोव्हेंबर 2027 आणि 28 फेब्रुवारी 2028 ते 24 जुलै 2028 या कालात गुरू ग्रह सिंह राशीत राहणार आहे, अशी माहिती
दा. कृ. सोमण यांनी दिली.





























































