
महागाईने आधीच मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना नव्या वर्षात जोरदार झटका बसणार आहे. टेलिकॉम कंपन्या रिचार्जच्या किमतीत 20 टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहेत. देशातील रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया कंपन्या रिचार्ज प्लानमध्ये वाढ करणार असून गेल्या 8 वर्षांत रिचार्जमधील ही चौथी वाढ असणार आहे. अमेरिकन फायनान्शियल सर्व्हिस कंपनी मॉर्गन स्टॅनलीच्या माहितीनुसार, हिंदुस्थानातील सर्व टेलिकॉम कंपन्या आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून यादरम्यान शुल्क 20 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहेत. हे शुल्क वाढवल्यानंतर ग्राहकांना 4 जी आणि 5 जी प्लानसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील.
टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफच्या दरात वाढ केल्यानंतर मोबाईल रिचार्जवर ग्राहकांना दर महिना कमीत कमी 50 रुपये ते 70 रुपये जास्तीचे द्यावे लागू शकतील. वार्षिक आधारावर सरासरी किमान 840 रुपये जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात. 2022 मध्ये 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर टेलिकॉम कंपन्यांची 5 जीमधील गुंतवणूक वाढवली आहे. केवळ लिलावातच कंपन्यांनी 1.5 लाख कोटी खर्च केले होते. त्यानंतर कंपन्यांनी स्वस्त 5 जी प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून दिले. आता जी गुंतवणूक केली आहे, ती वसूल करण्यासाठी कंपन्या रिचार्जमध्ये वाढ करणार आहेत. पुढील वर्षी जिओचा आयपीओ येणार आहे. गुंतवणूकदारांना अधिक परतावा देण्यासाठी जिओला आपली कमाई वाढवणे आवश्यक आहे. जिओच्या पावलावर पाऊल अन्य दुसऱया कंपन्याही ठेवतील. देशभरात रिलायन्स जिओचे एकूण 48 कोटी ग्राहक असून मार्केटमध्ये 41.38 टक्के, भारती एअरटेलचे 39 कोटी ग्राहक असून मार्केटमध्ये 33.59 टक्के, व्होडाफोन-आयडियाचे 20 कोटी ग्राहक असून मार्केटमध्ये 17.13 टक्के ग्राहक आहेत, तर सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचे 9 कोटी ग्राहक असून मार्केटमध्ये 7.9 टक्के ग्राहक आहेत.
असे असतील नवे दर
आताची किंमत – नंतरची किंमत
299 रुपये – 359 रुपये
349 रुपये – 419 रुपये
349 रुपये – 419 रुपये
349 रुपये – 405 रुपये
449 रुपये – 539 रुपये
340 रुपये – 408 रुपये
579 रुपये – 695 रुपये
452 रुपये – 542 रुपये
टेलिकॉम कंपन्यांनी याआधी तीन वेळा रिचार्ज प्लानमध्ये भरमसाट वाढ केलेली आहे. 2019 मध्ये 30 टक्के, 2021 मध्ये 20 टक्के आणि 2024 मध्ये 15 टक्के वाढ केली होती.




























































