
देशभरात दरवर्षी जवळपास पाच लाख रस्ते अपघात होत असून या अपघातात सरासरी 1.8 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभा सभागृहात दिली. काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी ही आकडेवारी सांगितली. ज्या 1.8 लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, त्यात 66 टक्के मृत्यू हे तरुणांचे आहेत. त्यांचे वय 18 ते 34 यादरम्यानचे आहेत.
रस्ते पायाभूत सुविधा सुधारून आणि कायदे कठोर करूनही सरकार मृत्यूंची संख्या कमी करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप प्रमोद तिवारी यांनी केला. यावर बोलताना गडकरी म्हणाले की, केंद्र सरकार राज्यांना आधुनिक रुग्णवाहिका देण्याची योजना आखत आहे. याअंतर्गत रुग्णवाहिका अपघात झालेल्या ठिकाणी अवघ्या 10 मिनिटांच्या आत पोहोचेल. जर जखमींना वेळेवर उपचार मिळाले तर त्यातील 50 हजार जीव वाचू शकतात, असे गडकरी म्हणाले. या वेळी त्यांनी आयआयएमच्या एका अभ्यासाचा हवालासुद्धा दिला. गेल्या पाच वर्षांत मंजूर झालेले 574 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प निश्चित वेळेपेक्षा मागे पडले आहेत. त्यांची एकूण किंमत जवळपास 3.60 लाख कोटी रुपये आहे. यापैकी 300 प्रकल्प एका वर्षापेक्षा कमी, 253 एक ते तीन वर्षे आणि 21 प्रकल्प तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून विलंबित आहेत.





























































