अॅडलेडवरही ऑस्ट्रेलियाचाच दबदबा, इंग्लंडच्या पहिल्या डावातही निराशाजनक फलंदाजी

पुनरागमन करणाऱ्या पॅट कमिन्स आणि नॅथन लायन या दोघांच्या गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अॅडलेड कसोटीवरही आपला दबदबा राखला आहे. कडक उन्हात रंगलेल्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इंग्लंडच्या आघाडीवीरांची 71 धावात विकेट काढत दिवसावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दिवसअखेर

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडची 8 बाद 213 अशी अवस्था केली असून अजूनही इंग्लंड 158 धावांनी पिछाडीवर आहे. याचाच अर्थ सलग दोन कसोटी जिंकल्यांतर ऑस्ट्रेलिया अॅडलेडवर विजयाची हॅटट्रिक करणार असल्याचे संकेत त्यांनी दुसऱयाच दिवशी दिले आहेत.

जखमी जोश हॅझलवूड वगळता ऑस्ट्रेलियाच्या मुख्य गोलंदाजांनी सपाट खेळपट्टीवरही इंग्लंडला अडचणीत टाकले. त्याआधी सकाळच्या सत्रात मिचेल स्टार्कने मोलाची अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 371 वर नेली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 53 धावांत 5 विकेट घेऊन आपली कामगिरी चोख बजावली.

यानंतर संघांत पुनरागमन करणाऱया कमिन्स आणि लायनच्या माऱयापुढे इंग्लंडच्या फलंदाजांची कसोटी लागली. कमिन्सने अचूक टप्प्यावर मारा करत झॅक क्रॉली, जो रूट आणि जेमी स्मिथ यांना बाद केले. दुसरीकडे लायनने एका षटकात ऑली पोप आणि बेन डकेट यांना माघारी पाठवत 564 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या आणि ग्लेन मॅकग्राला मागे टाकत शेन वॉर्ननंतर ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक विकेट टिपणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले.

4 बाद 71 नंतर हॅरी ब्रूक आणि बेन स्टोक्स यांनी काहीसा प्रतिकार केला. सलग दोन सत्रे फलंदाजी करणाऱया स्टोक्सने 151 चेंडूंत नाबाद 45 धावा केल्या, मात्र धावफलक फारसा हलवू शकला नाही. ब्रूक आक्रमणासाठी सज्ज दिसत असतानाच कमिन्सने कॅमरून ग्रीनला गोलंदाजी दिली आणि त्याने 138 किमी वेगाच्या चेंडूवर ब्रूकला बाद केले.

स्कॉट बोलँडने विल जॅक्स आणि ब्रायडन कार्स यांची विकेट काढली. अखेरीस स्टोक्स आणि आर्चर यांच्या झुंजार भागीदारीमुळे इंग्लंड फॉलोऑन टाळत 200 पार गेला, मात्र तरीही संघ अजूनही मोठय़ा संकटात आहे. तिसऱया दिवशी ऑस्ट्रेलिया शतकी आघाडी घेत मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मैदानात उतरून इंग्लंडचे खच्चीकरण करणार, हे पक्के आहे. इंग्लंडचा संघ आताच खचला असून त्यांना आता खेळाची नव्हे तर चमत्काराची गरज आहे. तूर्तास चमत्कार कठीण असून इंग्लंडची अॅशेसमध्ये राख होणे निश्चित आहे.