
रत्नागिरी जिह्यातील चार नगरपरिषदा आणि तीन नगर पंचायतींच्या मतदानाची मतमोजणी दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.त्याचबरोबर ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्राँग रूममध्ये व्हॅक्युम क्लीनर आणि वाळवी पेस्ट कंट्रोलही करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
दि. 2 डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले होते. संपूर्ण जिह्यात 68.14 टक्के मतदान झाले. त्यामध्ये रत्नागिरी नगरपरिषदेत 55.09 टक्के मतदान, चिपळूण नगरपरिषदेत 64.15 टक्के मतदान, खेड नगरपरिषदेत 62.53 टक्के मतदान, राजापूर नगरपरिषदेत 74.55 टक्के मतदान, लांजा नगर पंचायतीत 71.06 टक्के मतदान, देवरुख नगर पंचायतीत 74.33 टक्के मतदान आणि गुहागर नगर पंचायतीत 75.26 टक्के मतदान झाले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी राज्य राखीव दल आणि पोलीस यांचा बंदोबस्त आहे. स्ट्राँग रूममध्ये सिक्युरिटी ऑडिट करण्यात आले आहे. सुरक्षा कक्ष आणि बाहेरील बाजूला सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. व्हॅक्युम क्लिनिंग व्यवस्था आणि वाळवी लागू नये म्हणून पेस्ट कंट्रोल करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले.





























































