
बंद पडलेले तीन संच आणि कमी झालेल्या गॅसच्या पुरवठ्यामुळे २२५ मेगावॅटपर्यंत रोडावलेली उरण वायू विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती आता ४५० मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. या केंद्रासाठी १.७ एमएमएससीएमडी गॅसचा पुरवठा पूर्वी केला जात होता. मात्र तो आता २.४ एमएमएससीएमडीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. परिणामी केंद्रातील बंद असलेले दोन संच पुन्हा सुरू झाल्याने वीजनिर्मिती वाढली आहे. या विद्युत केंद्राची निर्मिती ६७२ मेगावॅट वीजनिर्मिती असून त्यासाठी ३.३ एमएमएससीएमडी गॅस पुरवठ्याची आवश्यकता आहे.
उरण-बोकडवीरा येथे जर्मनीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वायूवर चालणारा ६७२ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा वायू विद्युत केंद्र प्रकल्प उभारण्यात आला आहे. या वीजनिर्मिती प्रकल्पात चार गॅस टर्बाईन व दोन स्ट्रीम टर्बाईन असे एकूण सहा संच आहेत. याआधी या प्रकल्पाला गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून आवश्यकतेनुसार तीन एमएमएससीएमडीहून अधिक गॅसचा पुरवठा होत होता. त्यामुळे ६७२ मेगावॅट वीजनिर्मितीच्या या सहा संचातून याआधी ६०० हून अधिक मेगावॅट विजेची निर्मिती केली जात होती. मात्र त्यानंतर काही तांत्रिक अडचणी आणि आवश्यक त्या देखभालीअभावी मागील काही वर्षांपासून वायू विद्युत केंद्रातील सहापैकी तीन संच बंद पडले. त्यातच कंपन्यांकडूनही प्रकल्पाला गॅसचा पुरवठा तीन एमएमएससीएमडीऐवजी १.७ एमएमएससीएमडी इतक्या कमी प्रमाणात होऊ लागला. त्यामुळे या वायू विद्युत केंद्राच्या वीजनिर्मितीची क्षमता ६७२ मेगावॅटवरून २२५ ते ३०० मेगावॅटपर्यंत अगदी निम्म्यावर आले होते.
600 मेगावॅटचे लक्ष्य
वीजनिर्मिती प्रकल्पाला आवश्यकतेनुसार गॅसचा पुरवठा झाल्यास आगामी काळात या वीजनिर्मिती केंद्रातून सुमारे ६०० मेगावॅट वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे. हे लक्ष्य गाठण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय भविष्यात आणखी नवीन तंत्रज्ञान स्वीकारून आणि कार्यक्षमतेमध्ये सातत्य राखून उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्नही सुरू आहे, अशी माहितीही उरण वायू विद्युत केंद्राच्या सीजीएम विजया बोरकर यांनी दिली.






























































