
थर्टी फर्स्टचे काऊंटडाऊन सुरू झाले असून जंगी पार्त्या करण्याचे प्लॅन केले गेले आहेत. मात्र मौजमजेच्या नावाखाली गांजा, ड्रग्ज तसेच अन्य वस्तू आणून धिंगाणा करणाऱ्यांविरोधात कल्याण-डोंबिवली पोलिसांनी बारा दिवस आधीपासूनच कडक मोहीम हाती घेतली आहे. शहरांमध्ये येणाऱ्या ‘माला’वर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून कल्याणमध्ये ३५ किलो गांजा, गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत आठ तस्करांना अटक केली आहे तर फरार असलेल्या सहा जणांच्या मागावर पोलीस पथके रवाना झाली आहेत.
महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलीरामसिंग परदेशी व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद झोगडे व संतोष चौधरी यांच्या पथकाने वालधुनी परिसरात नाकाबंदी केली. दरम्यान, पोलिसांना छत्तीसगड पासिंगची एक कार संशयास्पद वावरताना दिसली. ही कार ताब्यात घेत पोलिसांनी झडती घेतली असता त्यांना ३५ किलो गांजा व एक गावठी पिस्तूल मिळाले. त्यानुसार पोलिसांनी कारमधील सरफराज आसिफ, रफिक शेख, फैजन शेख, समीर अली आणि आसिफ सय्यद अशा पाच जणांना बेड्या ठोकल्या.
फिल्मीस्टाईलने मुसक्या आवळल्या
पोलिसांची नाकाबंदी पाहून चालकाने गाडी वळवली आणि पळ काढला. संशय बळावल्याने पोलिसांच्या पथकाने त्यांचा तत्काळ पाठलाग सुरू केला. यावेळी तस्करांनी पोलिसांच्या अंगावर गाडी चढवण्याचाही प्रयत्न केला. अखेर फिल्मीस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी या तस्करांच्या मुसक्या आवळल्या.
भिवंडी, नागपूर, ओडिशात कारवाई
पोलिसांनी भिवंडी, नागपूर, ओडिशात, अमरावती, भंडाऱ्यात कारवाई करत शाहिद अब्दुलगणी शेख, शाहिद शेख व रवींद्र मिर्धा यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सर्व आरोपींवर नागपूरमधील पोलीस ठाण्यात ४० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.






























































