….ठाकरेंच्या भीतीपोटी करतायेत नकलीपणाचा शृंगार.. अंबादास दानवेंचा कवितेतून पलटवार

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच भाजप नेते आशिष शेलार यांनी एक्सवर एक कविता ट्विट करत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर टीका केली होती. आता त्यांच्या या कवितेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक कविता पोस्ट करत भाजपला करारा जबाब दिला आहे. अंबादास दानवे यांनी केलेल्या या पलटवाराची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

अंबादास दानवे यांनी आपले सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर ही कविता पोस्ट केली आहे. त्या कवितेत त्यांनी म्हटले आहे की,

दुसऱ्याच्या कामावर आयत्या रेघोट्या मारत आहेत,
उद्योजकांच्या दलालीची दुकाने मुंबईत थाटत आहेत..

‘करून दाखवलं’ या शब्दाने तुम्हाला लागलाय अंगार,
ठाकरेंच्या भीतीपोटी करतायेत नकलीपणाचा शृंगार..

मुंबईचा पैसे उडवून तरी मुंबईकर मतांची आशा,
राज्य कर्जबाजारी करणारे करताहेत मुंबई वाचवण्याची भाषा..

हिंदी भाषा लादणारे ओढून बसलेत मराठीची चादर,
आता हे ढोंगी शिकवणार ठाकरेंना हिंदुत्वाचा गजर..

सिकंदर बख्त, आरिफ बेग ज्यांचे संस्थापक नेते,
अधून मधून देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटण्याचे खाज त्यांना येते..

असे लिहीत भाजपला चांगलाच चिमटा काढलेला आहे.