प्रशिक्षक नव्हे, संघ व्यवस्थापक हवा! कपिल देव यांचे गौतम गंभीरबाबत परखड मत

आजच्या आधुनिक क्रिकेट व्यवस्थेत गंभीरकडे कोच म्हणून नव्हे, तर संघ व्यवस्थापक म्हणून पाहिले गेले पाहिजे, असे परखड मत हिंदुस्थानच्या पहिल्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी माजी हिंदुस्थानी सलामीवीर आणि हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबाबत मांडले आहे.

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या आयसीसी शताब्दी सत्रात बोलताना कपिल म्हणाले की, सध्याच्या क्रिकेटमध्ये ‘कोच’ या शब्दाचा अर्थच बदलला आहे. सर्वोच्च पातळीवर खेळाडू आधीच आपल्या काwशल्यात प्रगल्भ असतात, त्यामुळे तांत्रिक कोचिंगपेक्षा व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे ठरते. हिंदुस्थानला घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेत 0-2 अशा पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर गंभीरवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर कपिल यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. खेळाडूंच्या सततच्या रोटेशन धोरणावर आणि अष्टपैलूंवर अतिविश्वास ठेवल्यामुळे गंभीरवर टीका होत आहे.

कपिल देव यांनी सांगितले की, संघात सकारात्मक वातावरण निर्माण करणे ही कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाची संयुक्त जबाबदारी आहे. ‘लेगस्पिनर किंवा यष्टीरक्षकाला कोच करणे शक्य नाही, कारण ते आधीच तज्ञ असतात. अशा वेळी संघ व्यवस्थापकाची भूमिका निर्णायक ठरते. तो खेळाडूंना विश्वास देतो आणि आत्मविश्वास वाढवतो. आपल्या कर्णधारपदाच्या अनुभवाचा संदर्भ देताना कपिल म्हणाले की, शतक करणार्यांपेक्षा संघर्ष करणार्या खेळाडूंना मानसिक आधार देणे अधिक गरजेचे असते. नेतृत्व हे केवळ वैयक्तिक कामगिरीपुरते मर्यादित नसून संपूर्ण संघ एकत्र बांधण्याची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.